सांगली : कोरोनाची लस शनिवारीदेखील जिल्ह्याला प्राप्त झाली नाही. त्यामुळे रविवारी लसीकरण बंदच राहणार आहे. गेल्या मंगळवारी ८ हजार २०० डोस मिळाले होते, त्यानंतर आजअखेर लस मिळालेली नाही. विविध केंद्रांवर उपलब्ध साठ्यातून अत्यल्प लसीकरण सुरू आहे. शनिवारी दिवसभरात १ हजार १९३ जणांचे लसीकरण झाले. ९८० जणांना पहिला डोस व २१३ जणांना दुसरा डोस मिळाला. यामध्ये आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात फक्त ८९ जणांना तर ग्रामीण भागात ६५१ जणांना लस मिळाली. निमशहरी भागात ४५३ जणांचे लसीकरण होऊ शकले. आजवरचे लसीकरण ६ लाख ५५ हजार ८८ इतके झाले.
दरम्यान, रविवारी पुण्यातून लस येण्याची शक्यता आहे.
लस आल्याचा निरोप मिळाल्याने कोल्हापूर विभागाची व्हॅन रविवारी सकाळी निघणार आहे. संध्याकाळपर्यंत परतल्यानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वाटप होईल. त्यामुळे सोमवारी लसीकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.