लोकमत न्यूज नेटवर्क
कडेपूर : कडेपूर (ता.कडेगाव) येथील उपकेंद्रामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संग्राम देशमुख यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावशाली असून, जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले आहे.
संग्राम देशमुख म्हणाले, सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपण सर्वांनी तातडीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे.
यावेळी सरपंच रूपाली यादव, उपसरपंच संग्राम यादव, लालासाहेब यादव, अमर यादव, पंजाबराव यादव, दादासाहेब यादव, महावीर वाघमारे, सूर्याजी यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली मोतीकर, डॉ.आस्मा अत्तार, डॉ.योगेश पावले, आरोग्यसेवक रामदास फुलावरे, आरोग्यसेविका मीना फुलावरे, ग्रामविकास अधिकारी अनिल जमदाडे उपस्थित होते.