जत : जत आगारातील सर्व चालक व वाहक अशा २८२ जणांना कोणतेही काम नसताना हजेरीच्या नावाखाली सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एका लहान खोलीत ताटकळत ठेवले जात आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढणार आहे, अशी भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
जत आगारात १६३ चालक, तर ११९ वाहक कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्यांना नियमित व वेळेवर काम मिळत नाही. त्यामुळे पुरेसा पागार त्यांच्या हातात येत नाही. वेळप्रसंगी कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य कसेतरी दिवस काढत आहेत. दि. १७ एप्रिलपासून ज्या चालक व वाहकांना ड्युटी लावली आहे, त्यांनी वेळेवर हजर राहणे तसेच ज्या चालक व वाहकांना ड्युटी लावण्यात आली नाही अशा सर्वांनी जत आगारामध्ये कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे. आगारातील नोंदवहीमध्ये आल्यानंतर व परत जाताना अशी दोनवेळा सही करावी.
मुंबई ग्रुपमधील सर्व चालक व वाहकांनी सकाळी सात वाजता उपस्थित राहून सही करावी व परत जाताना एकदा सही करावी.
कोल्हापूर विभागातील वयस्कर पूर्व व महिला ग्रुपमधील सर्व चालक आणि वाहकांनी दुपारी १२ वाजता उपस्थित राहून सही करावी. परत जाताना एकदा सही करावी, असा लेखी आदेश जत आगार व्यवस्थापक यांनी काढला आहे.
जत आगारात कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नाहीत. एका लहान खोलीत २८२ कर्मचारी दाटीवाटीने कसेतरी थांबून राहत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे कोणत्याही नियमाचे पालन केले जात आहे. आगार व्यवस्थापकांनी मोठ्या खोलीत कर्मचाऱ्यांची सोय करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.