सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाअंतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच प्रवेश दिला जात आहे. वैयक्तिक व इतर कामासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असली तरी, तो काढताना कोरोना निगेटिव्ह अहवालाची गरज नसून नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारेच अर्ज करावा, असे आवाहन पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.
‘ई-पास’साठी अर्ज करताना त्यासाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल जोडण्याविषयी नागरिकांत संभ्रम होता. त्यासाठी काही गैरप्रकार घडल्याचेही समोर आले होते. त्यामुळे अधीक्षक गेडाम यांनी ई-पाससंदर्भात माहिती दिली.
अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या ब्रेक द चेन उपक्रमानुसार संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. त्यातही अत्यावश्यक कारणांसाठी पासची आवश्यकता असणार नाही. फक्त वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करावा लागत असेल, तर त्यासाठी ई-पास आवश्यक आहे. या पाससाठी अर्ज करताना त्यासोबत कोरोनाच्या निगेटिव्ह अहवालाचीही आवश्यकता नाही, तर केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यासही पास मंजूर करण्यात येणार आहे. याशिवाय स्वघोषणापत्रही आवश्यक आहे. कोरोना निगेटिव्ह अहवालाची अट नसली तरी, लक्षणे असलेल्या व्यक्तींनी प्रवास टाळावा, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.