सांगली : जिल्हा परिषदेत कोरोनाने कर्मचाऱ्यांचा पाठलाग सुरूच ठेवल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बांधकाम विभागातील दोघा कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी अनेक काटेकोर उपाययोजना करुनही जिल्हा परिषदेत कर्मचरी बाधित होतच आहेत. बांधकाम विभागातील एक महिला स्थापत्य सहायक आणि एक पुरुष लिपिक कोरोनाबाधित झाला आहे. शनिवारी त्यांनी कार्यालयात नियमित कामकाज केले होते. आज त्यांचा अहवाल समजताच अन्य कर्मचाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सर्वांची रॅपिड ॲंंटिजेन चाचणी करण्यात आली, मात्र कोणीही बाधित आढळले नाही.
जिल्हा परिषदेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग बांधकाम विभागात होत आहे. आजअखेर विभागप्रमुखांसह नऊजण बाधित झाले आहेत. बाहेरील व्यक्तींचा संपर्क या विभागात जास्त असल्याचा हा परिणाम आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अभ्यागतांच्या चाचणीसाठी कर्मचारी नेमले असले, तरी त्यांच्याकडून प्रत्येकाची तपासणी होत नाही. सामान्य प्रशासन विभागातही तिघे कर्मचारी शनिवारी बाधित आढळले होते.
चौकट
आजपासून ५० टक्के उपस्थिती
जिल्हा परिषदेत कोराेनाचा फैलाव सुरू झाल्याने ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय झाला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सांगितले.