लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्पात शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वतः लस घेतली. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात येत असलेली लस सुरक्षित असून भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी लस घेत मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात यापूर्वीच आरोग्य क्षेत्रातील शासकीय व खासगी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झालेले आहे. आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाचा गंभीर दुष्परिणाम झालेला नाही. खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, आदी उपस्थित होते.
चौकट
जिल्ह्यात आत्तापर्यंत ग्रामीण भागात ५ हजार ९५, तर शहरी भागात ४ हजार १४८ अशा एकूण ९ हजार २४३ जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून नवीन १६ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून, आता एकूण ३३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.