सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर केला. या कडक निर्बंधामध्ये महापालिका क्षेत्रात पूर्वीपेक्षा रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे लाॅकडाऊनच्या नियमांचे ऑडिट करण्याची गरज आहे.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात ७ ते १५ मे या दरम्यान आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. किराणा, भाजीपाला दुकानेही बंद करण्यात आली. सकाळी सात ते अकरा या वेळेतील संचारबंदीवर बंधने आली. त्यामुळे शहरातील जनतेला कडक लाॅकडाऊनचा अनुभव पुन्हा आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रशासनाने कोरोना बेडची संख्या वाढविली होती. ऑक्सिजनसह औषधांचा पुरवठा होण्यासाठीही कसरत केली होती. मध्यंतरी ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. त्या काळातही प्रशासनाने धावाधाव केली.
कडक लाॅकडाऊनपूर्वी प्रशासनाने शहरात काही निर्बंध लागू केले होते; पण या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करण्यात येत नव्हते. सकाळच्या टप्प्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नव्हती. भाजीपाला, किराणामाल, फळे खरेदीसाठी गर्दी होत होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ७ मेपासून कडक लाॅकडाऊन जाहीर केला. पण या काळात कोरोना रुग्णांची संख्या घटण्याऐवजी वाढल्याचे दिसून येते. शहरात लाॅकडाऊनपूर्वी म्हणजे १ ते ६ मेपर्यंत ११९६ रुग्ण बाधित आढळून आले, तर ४७ जणांचा मृत्यू झाला होता. लाॅकडाऊनच्या काळात ७ ते १५ मेदरम्यान १६६१ रुग्ण आढळून आले असून, ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचा हेतू सफल होत नसल्याचे कोरोना रुग्ण व मृत्यूच्या प्रमाणावर नजर टाकल्यास दिसून येते.
चौकट
कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. टाळेबंदीपूर्वीच्या १ ते ६ मेदरम्यान ५९३१ जणांनी कोरोनावर मात केली होती, तर लाॅकडाऊनच्या काळात ७ ते १५ मेदरम्यान ११ हजार ३९ जण कोरोनामुक्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
चौकट
लाॅकडाऊनमध्ये महापालिका क्षेत्रातील स्थिती
दिनांक कोरोना रुग्ण मृत्यू
७ मे २९७ ९
८ मे १८६ ८
९ मे २०१ ९
१० मे १२९ ४
११ मे १६८ ८
१२ मे १६७ २
१३ मे २०० १२
१४ मे १६९ १३
१५ मे १४४ ९