सांगली : मुंबईतील प्रवाशांच्या सेवेसाठी सांगली जिल्ह्यातील बसेस आणि ५० चालक व वाहकांना पाठविले होते. यापैकी प्रत्येक जण कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्यांनी तपासणी न करताच जिल्ह्यात एसटीची सेवा केली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होण्यास मुंबईला गेलेले एसटीचे चालक, वाहकही कारणभूत आहेत. याप्रकरणी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रवासी प्रतिनिधी धोंडिबा घोरपडे यांनी केली आहे.
घोरपडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे, तरीही सांगलीतील चालक, वाहक मुंबईला पाठवत आहे. मुंबईला गेलेले वाहक व चालक पुन्हा सांगलीत आल्यावर त्यांना १४ दिवस क्वाॅरंटाइन न करताच पुन्हा सेवेवर बोलविले जात आहे.
हे चालक व वाहक पुन्हा हजारो प्रवाशांना बाधित करीत आहेत. हजारो लोकांच्या जिवाशी खेळणे एसटी प्रशासनाने त्वरित बंद करावे, अन्यथा चालक, वाहक आणि प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, एसटीच्या महाव्यवस्थापक, राज्य मानवी हक्क आयोगाकडे पाठविले आहे.