सांगली : कोरोनामुळे जिल्हाभरात ६६६ बालकांनी एक पालक गमावला आहे. १८ बालके अनाथ झाली आहेत. त्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली.
या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन केलेल्या कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने, महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी संदीप यादव, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचेता मलवाडे, बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांच्यासह कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, या सर्व अनाथ बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी मदत मिळवून द्यावी. अनाथ प्रमाणपत्रासाठी कार्यवाही करावी. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना समाज कल्याण, महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत शासकीय योजनांचा लाभ द्यावा.
सुवर्णा पवार यांनी सांगितले की, कोरोनामुळे १८ बालक अनाथ झाले आहेत. ६६६ बालकांनी एक पालक गमावला आहे. यापैकी ६५१ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण झाले आहेत. ५७२ बालकांसाठी बाल संगोपन योजनेचे आदेश दिले आहेत. १२ अनाथांचे संयुक्त बँक खाते उघडले आहे.