शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

सहकारातील तपस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

दादांच्या कार्याविषयी लिहिताना अनेक आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. माझे पिताजी राजारामबापू यांच्या निधनानंतर मी १९८४ साली साखर कारखान्याचा अध्यक्ष ...

दादांच्या कार्याविषयी लिहिताना अनेक आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. माझे पिताजी राजारामबापू यांच्या निधनानंतर मी १९८४ साली साखर कारखान्याचा अध्यक्ष झालो. तेव्हा दादा कारखान्याचे संचालक होते. माझ्या अगोदरचे कारखान्याचे अध्यक्ष स्व. बाबासाहेब पाटील यांचे दादा हे जवळचे नातेवाईक. दादांना राजकारणात मा. बापूंनीच आणले. बापूंचा दादांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. बापूंवर दादांची प्रखर निष्ठा होती. दादांची खरी ओळख मी कारखान्याचा अध्यक्ष झाल्यानंतर झाली. दादा हे मितभाषी व कुणाबद्दलही वाईट बोलणारे नाहीत. त्यांना आपल्या गावाबद्दल व पेठ-कोल्हापूर रोडच्या पश्चिमेस असलेल्या वाळवे तालुक्यातील गावाबद्दल विशेष प्रेम होते व आहे. त्या भागाचा विकास व्हावा, हा त्यांचा ध्यास असायचा. प्रामुख्याने त्यांच्या कुरळप गावामध्ये विकासाच्या सर्व योजना राबविल्या जाव्यात, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी स्वत:च्या मालकीच्या जागा पोलीस स्टेशन, वीज केंद्र, बेघर वसाहतीला मोफत दिल्या, हे त्यांचे दातृत्व आहे. दादांकडे कोणीही पाहुणा आला तर त्यांना जेवूखाऊ घातल्याशिवाय दादा सोडत नाहीत. मी तर दरवर्षी अनेकदा त्यांच्या घरचा पाहुणचार घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा जिव्हाळा व प्रेमही त्यामध्ये ओतलेले असते.

दादांचे त्यांच्या कुटुंबावर जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम कुरळपमधील गावकऱ्यांवर आहे. कुरळप गाव सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून दादांनी वारणा नदीवरून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली. कुरळप, लाडेगाव, वशी व जक्राईवाडी ही संयुक्त पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेमुळे या चारही गावांतील १०० टक्के जमीन ओलिताखाली आली. मध्यंतरी या योजनेची नदीवरील जॅकवेल कोसळली. त्यामुळे या चारही गावाचा जमिनीचा पाणी पुरवठा खंडित झाला. त्यावेळी दादा बेचैन झाल्याचे मी पाहिले आहे. पाण्याअभावी शेतातील पिके सुकू लागली. मुरमाड जमिनी असल्यामुळे ऊस वाळू लागला. दादांनी रात्रंदिवस प्रयत्न करून आठ ते दहा दिवसांत नदीतील जॅकवेल पुन्हा उभी केली व शेतीला पूर्ववत पाणी पुरवठा होऊ लागला. त्या कालावधीत दादांना झोपही आली नाही. दादांना आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे केले. निवडणुकीमध्ये दादांना टेंशन आले होते. अटीतटीची निवडणूक झाली. दादा प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले. जिल्हा बँकेतही दादांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्याच काळात त्यांनी आपल्या गावात जिल्हा बँकेची शाखा सुरू केली.

साखर कारखान्याचे संचालकांना मीटिंगसाठी येण्यासाठी वेगवेगळ्या रूटवर गाड्या पाठवल्या जात; परंतु दादा कधीही कारखान्याच्या गाडीतून येत नसत, तर स्वत:च्या स्कूटरवरून येलूरमार्गे कारखान्यावर येत असत. वेळी-अवेळी त्यांना इस्लामपूर व कारखान्यावर यावे लागे; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू असल्यामुळे त्यांना कधी भीती वाटली नाही. १९८४ साली मी कारखान्याचा अध्यक्ष झाल्यावर प्रथम आष्ट्याचे आनंदराव शिंदे हे उपाध्यक्ष झाले. त्यांचे निधन झाल्यावर येडेनिपाणीचे हिंदूराव पाटील हे उपाध्यक्ष झाले. पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणुका झाल्यावर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते पी. आर. पाटील (दादा) यांची निवड झाली. १९९० सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी विधानसभेचा सदस्य झाल्यावर माझा बहुतांश वेळ मुंबई येथे जाऊ लागला. या काळात कारखान्याची सर्व जबाबदारी पी. आर. दादा पाहू लागले. त्यावेळी सहकारी संस्थेमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चेअरमन पदावर राहता येत नसे. तसा कायदा होता. १९९८ साली माझी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची दहा वर्षे पूर्ण झाल्यावर अध्यक्षपदी कोणाची निवड करायची, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर माझ्यापुढे एकमेव नाव पी. आर. पाटील दादांचेच होते. कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते पूर्णवेळ कारखान्याच्या

कामकाजात भाग घेऊ लागले. कारखान्याच्या बाबतीत मी जे प्रस्ताव मांडत असू, त्याची तंतोतंत कार्यवाही व पाठपुरावा करण्याचे काम दादा करीत असत. दादांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच राजारामबापू साखर कारखान्याचे वाटेगाव, कारंदवाडी व जत येथे शाखा सुरू झाल्या. सहकारामध्ये हा एक अभिनव प्रयोग होता. बँकांच्या शाखा असतात; पण साखर कारखान्याची एक नव्हे, तीन शाखा यशस्वीपणे चालविण्याचे काम दादांनी केले आहे. दादा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व गावांना दरवर्षी भेट देऊन ऊस उत्पादक सभासदांच्या अडचणी समजावून घेतात व त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला कारखान्याच्या समस्यांबाबत अजिबात लक्ष घालावे लागत नाही. दादांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा. दादांना व काकींना उदंड आयुरारोग्य लाभो व त्यांच्या हातून यापुढेही सहकार, शिक्षण व समाजोपयोगी कार्य घडो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!!

- ना.जयंतराव पाटील

जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य.