सांगली : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या ५६ दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जूनपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकू, असा इशारा बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. महापालिकेच्या माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राकडील तेरा कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन ठेकेदाराकडील कामे अपूर्ण असल्याची तक्रार केली होती. या अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात नागरिकांनी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली होती. त्यासंदर्भात बुधवारी महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समिती सभापती संतोष पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील मजलेकर उपस्थित होते. बैठकीत ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे ठेकेदार थरमॅक्स कंपनीची महापौरांनी झाडाझडती घेतली. या केंद्राचे केवळ ७५ लाख रुपयांचे काम बाकी आहे. ठेकेदाराकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यात तातडीने दुरुस्ती करावी. येत्या जूनअखेरपर्यंत काम पूर्ण न झाल्यास ठेका रद्द केला जाईल, असा इशाराही ठेकेदाराला देण्यात आला. माळबंगला येथे ७५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम लक्ष्मी कंपनीकडे आहे. त्यासाठी अजून ३० कोटीची गरज आहे. जूनमध्ये कंपनीकडून यंत्रसामग्री येणार आहे. त्यामुळे आॅगस्टअखेरीपर्यंत जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करावे, अशी सूचनाही या ठेकेदाराला देण्यात आली. काम वेळेत पूर्ण झाले नाही तर दंडाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. (प्रतिनिधी)कामाबाबत तक्रारी : दुर्लक्ष नको --जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले नाही तर नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, असा इशारा कर्मचाऱ्यांनीच दिला आहे. ठेकेदाराच्या कामाबाबत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला आहे. केंद्रावरील एक क्लॉरीफायर बंद आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेची गुणवत्ता कमी झाली आहे. हे क्लॉरीफायरही तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
...तर ठेकेदार कंपनी काळ्या यादीत!
By admin | Updated: May 12, 2016 23:57 IST