सांगली : जिल्ह्यातील व्यापाराला काही अटींवर सवलत देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतल्याने व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाघिकारी, बेकरी असोसिएशन, फळे, भाजीपाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह महापालिका क्षेत्रातील विविध संघटना तसेच जिल्ह्यातील प्रमुख शहरातील व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये व्यापार सुरू करण्याबाबत तसेच अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या गोष्टीचा विचार करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार लगेचच सोमवारी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यास काही वेळासाठी, तर अन्य अत्यावश्यक सेवांच्या घरपोच सवलतीची घोषणा करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विविध व्यापाऱ्यांनी याबद्दल पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत. लवकरच परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काही सवलती देण्याबाबतही पालकमंत्र्यांंकडून विचार होणार आहे.