प्रताप बडेकर - कासेगाव -‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या, ‘कासेगावच्या विकासासाठी विरोधक एकत्र येणार का?’ या वृत्ताची कासेगाव व परिसरात चांगली चर्चा सुरु आहे. या तिन्ही नेत्यांनी याची दखल घेतली असून उत्स्फूर्त व संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दि. २६ रोजी ‘लोकमत’मधील या वृत्ताची जोरदार चर्चा गावात सुरु होती. ‘लोकमत’ने परखडपणे या तिन्ही गटातील मतभेदांवर प्रकाश टाकला होता. विरोधी गट प्रबळ असूनही अंतर्गत मतभेदाने त्यांची राजकीय शक्ती कमी झाली असून, गावाच्या विकासासाठी हे तिन्ही नेते एकत्रित येतील का, हे येणारा काळच ठरवणार आहे.कासेगाव येथे माजी मंत्री जयंत पाटील गटाची एकहाती सत्ता असून त्यांच्याकडेच सर्व सत्तास्थाने आहेत. विरोधक गटा-तटात विखुरलेले आहेत. गावात विरोधकांचे तीन गट पडले असून त्यांचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अॅड. बी. डी. पाटील, बापूसाहेब शिंदे, नेताजी पाटील सध्या वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे विरोधी गटाची ताकद कमी झाली आहे. हे तिन्ही नेते विकासाच्या मुद्यावरुन एकत्र येणार का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.मी स्वत: व शिंदे सरकार आम्ही एकत्रित राजकारण करत आलो आहे. सध्या मात्र तरुण पिढीला स्वत: नेता म्हणून मिरवायचे असून, कर्तृत्व मात्र काही नाही. मी तत्त्वाचे राजकारण करत आलेलो आहे. जर पक्षविरहित झेंडे बाजूला ठेवून एकत्र येत असाल, तर आम्हीही गावाच्या विकासासाठी एकत्र येण्यास तयार आहोत.- अॅड. बी. डी. पाटील, कासेगाव.अॅड. बी. डी. पाटील व मी आजवर एकत्रित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष केला आहे. मात्र आता आमच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. आम्ही एकत्रित येणे शक्य नाही. आ. शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा गट एकसंध असून आम्हीही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविणार आहोत.- बापूसाहेब शिंदे,कासेगाव.आम्ही भविष्यात एकत्रित येऊ. मात्र काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना पाटील नावाची अॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पडद्यामागून हालचाली चालवल्या आहेत. आम्ही सत्ताधारी गटाविरोधात कायमच संघर्ष करत आहोत. येथून पुढेही त्यांना आमचा विरोधच असणार आहे. भले गावातील निवडणुकांमध्ये आम्हाला अपयश आले तरी, सहजासहजी सत्ताधाऱ्यांना यश मिळू देणार नाही.- नेताजी पाटील, कासेगाव
कासेगावात विरोधकांमध्ये ऐक्यविचार..!
By admin | Updated: June 8, 2015 00:49 IST