लोकमत न्यूज नेटवर्क
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ‘ब’ दर्जा असणारे श्री बिरोबा देवाचे मंदिर हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराजवळून दोन राष्ट्रीय महामार्ग तयार केले जात आहेत. त्यामुळे हे मंदिर काँक्रिट रस्त्याने या दोन्ही मार्गाना जोडावे, अशी मागणी भाविकांतून केली जात आहे.
मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटरवर पश्चिमेला नागज फाटा येथून नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग जातो; तर पूर्वेकडून ढालगाववरून सुमारे पाच-सहा किलोमीटरवरून चोरोची येथून विजयपूर-गुहागर हा राष्ट्रीय मार्ग जातो. मंदिराच्या पूर्व बाजूने तीन किलोमीटरवरुन ढालगाव येथूनच मिरज-पंढरपूर हा रेल्वेमार्ग जातो. हे तिन्ही मार्ग या तिर्थक्षेत्राला जोडल्यास भाविकांची सोय होणार आहे. त्याचबरोबरीने रेल्वे, बस, पर्यटनस्थळ यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन या भागातील अर्थकारण बदलणार आहे.
चाैकट
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा हवा
खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले वजन वापरुन रस्ते कामासाठी पाठपुरावा करावा, यामुळे येणाऱ्या भाविकांची सोय होईल. सध्या मंदिर परिसरातील दहा किलोमीटरवरील एकेरी वाहतुकीसाठीचे हे रस्ते अपघातासाठी निमंत्रण ठरत आहेत. त्यामुळे या सर्व रस्त्यांवर दुहेरी वाहतुकीची सोय करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
फोटो-०३ढालगाव०१
फोटो ओळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाचे मंदिर.