लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इंधन व गॅस दरवाढीविरोधात सोमवारी सांगलीत युवक काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ केल्याने सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने सरकारचा निषेध करीत सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवनापासून रॅलीस सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका, शिवाजी मंडई, रिसाला रोड, पंचमुखी मारुती रोड, राम मंदिर चौकातून ही रॅली पुन्हा काँग्रेस भवनात आली.
यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने इंधन व गॅसची विक्रमी दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर असताना देशात इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर जात आहेत. हे सर्व दर लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला परवडतील असे करावेत. जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल. जिल्हा युवक काँग्रेसने सांगितले. रॅलीत युवा नेते डॉ. जितेश कदम, मंगेश चव्हाण, संदीप जाधव, सुहेल बलबंड, प्रमोद जाधव, संभाजी पाटील, अमित पारेकर, योगेश राणे, स्वप्नील मिरजे, सागर काळे, सनी धोत्रे, आशिष चौधरी, उत्कर्ष खाडे, आयुब निशानदार, संग्राम गिरी, अमित उजगरे, अरबाज शेख, शैलेश शेजाळ, जावेद मुल्ला आदी सहभागी झाले होते.