सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत कॉँग्रेसचा सत्तासहभाग ‘आॅफर’भरोसे आहे. कॉँग्रेसने पदांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात जाणार नसल्याची भूमिका घेतली असली, तरी राष्ट्रवादीने कॉँग्रेसला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पदांच्या सहभागाबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. घटकपक्षांची संख्या अधिक असल्याने सत्ताधाऱ्यांना पदे वाटताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आता संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेल सत्तेत आले असले, तरी पदांबाबत त्यांना पाच वर्षात मोठ्या कसरती कराव्या लागणार आहेत. त्यांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना व कॉँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत दावेदारांची संख्या वाढणार आहे. राष्ट्रवादीतच अनेक दिग्गज नेते अध्यक्षपदासाठी आतापासून तयारीला लागले आहेत. उपाध्यक्षपदासाठी भाजपची दावेदारी असली तरी पाच वर्षात एकदा तरी अध्यक्षपद मिळावे म्हणून भाजप व शिवसेनाही प्रयत्नशील राहण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी कॉँग्रेसलाही सोबत घेण्याची भूमिका राष्ट्रवादीला पदांमधील वाटेकरी वाढवून घेणारी ठरणार आहे. बॅँकेत काम करताना कॉँग्रेस विरोधी पक्ष म्हणून राहिला तर सत्ताधाऱ्यांना ती डोकेदुखी ठरू शकते. विरोधकच ठेवायचा नाही, ही भूमिका राष्ट्रवादीची असल्यामुळे त्यांनी जिल्हा बँकेतही कॉंग्रेसला बरोबर घेऊन काम करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. बरोबर घेताना त्यांना पदांचीही ‘आॅफर’ द्यावी लागणार आहे. त्याशिवाय कॉंग्रेसही विनाकारण त्यांच्यासोबत जाणार नाही. आॅफर स्वीकारतानाही ती समाधानकारक असेल तरच त्याचा विचार कॉंग्रेसचे नेते करू शकतील. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसचा सत्तेतील सहभाग ‘आॅफर’भरोसे
By admin | Updated: May 11, 2015 00:42 IST