ओळ : इस्लामपूर येथे कॉंग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेंद्र शिंदे, ॲड. मनीषा रोटे, ॲड. आकीब जमादार, ॲड. आर. आर. पाटील, विनायक तांदळे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असणाऱ्या मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा इस्लामपूर शहर कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकारविरोधी आणि ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे, शहर उपाध्यक्ष ॲड. आकीब जमादार, ॲड. आर. आर पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व इस्लामपूर शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक तांदळे, नितीन पेटकर, गणेश कळसे उपस्थित होते.
राजेंद्र शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याचे पापदेखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचेच आहे.
शहर उपाध्यक्ष ॲड. आकीब जमादार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु त्यांनी ती दिली नाही. त्यामुळेचे ओबीसींचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे.