भवानीनगर (ता.वाळवा) येथे आमदार मोहनराव कदम यांचेहस्ते विठ्ठल पाटील यांना सरबत पाजून उपोषण सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील भुयारी रेल्वे मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोहनराव कदम यांनी दिल्याने विठ्ठल पांडुरंग पाटील यांच्यासह वाळवा व कडेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेले उपोषण सोडण्यात आले.
रेल्वे भुयारी मार्गावरील साचलेले पाणी उपसावे व रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता भवानीनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली.
अर्थक्रांती संघटनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष अशोक गोडसे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, आनंदराव जाधव, एच.आर.पाटील, अॅड.रामराव मोहिते यांच्यासह कडेगाव व वाळवा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक उपोषणास बसले होते.
ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वतीने सुरु करण्यात आलेल्या या उपोषणाची खासदार धैर्यशील माने व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन उपोषण करणाऱ्या सर्वांशी दूरध्वनीव्दारे चर्चा करुन भुयारी रस्त्याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी या भुयारी मार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची केलेली विनंती मान्य करून सर्वांनी आमदार कदम यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी सोनहिरा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पी. सी. जाधव, कृष्णाचे माजी संचालक पै. हणमंतराव पाटील, धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, धनंजय रसाळ, प्रांजली बँकेचे अध्यक्ष संदीप दादा सावंत, मधुकर हुबाले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला.
यावेळी भवानीनगरचे सरपंच राजेश कांबळे, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच दीपक घाडगे, माजी उपसरपंच भरत कदम, हरिभाऊ सावंत, रोहित मोहिते, किरण माळी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आभार मानले.