लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : फुपेरे (ता. शिराळा) येथे सर्व ग्रामस्थ व मुंबईकरांनी लोकसहभागातून हनुमानाचे देखणे मंदिर उभारले आहे. नुकतेच हेे काम पूर्णत्वास गेले आहे. मंदिराच्या उभारणीमुळे गावच्या लौकिकात भर पडली आहे.
फुपेरे येथे हनुमानाचे जुने मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी वेगवेगळ्या स्वरूपात योगदान देत हे देखणे मंदिर उभारले आहे. मंदिराची रचना व मूर्ती आकर्षक आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने मोठा खर्च करीत मंदिराचे काम पूर्णत्वास नेले आहे.
मुंबईत राहणारे गावातील नागरिक व स्थानिक ग्रामस्थ यांनी गेल्या काही वर्षांत समन्वयातून ग्रामदैवत काळेश्वर, सिद्धेश्वर, ज्योतिर्लिंग आणि आता हनुमान मंदिर उभारले आहे. शिवाय स्मशानभूमीचाही विकास केला आहे. या सर्व सार्वजनिक कामांमुळे फुपेरे ग्रामस्थांचा एक चांगला आदर्श जनमानसात निर्माण झाला आहे.