बेडग येथे जातपंचायतीने तीन कुटुंबांना वाळीत टाकल्याची तक्रार पीडित भीमराव मासाळ कुटुंबीयांनी पोलिसांत केली आहे. मात्र, न्याय मिळत नसल्याने मासाळ यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. सात वर्षांपूर्वी भीमराव मासाळ कुटुंबाला जातपंचायतीने वाळीत टाकले होते. त्यावेळी पोलीस व गावातील नेतेमंडळींच्या मध्यस्थीने हा विषय मिटवण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून समाजातील काही लोकांनी मासाळ कुटुंबास त्रास देऊन बिरोबा मंदिरात प्रवेशास प्रतिबंध, मंदिरात व पालखी कार्यक्रमात ढोल वाजवण्यास मज्जाव करून कुटुंबास वाळीत टाकल्याची तक्रार आहे. समाजातील काही मंडळींनी मंदिरासमोर ढोल वाजवण्यास विरोध करून मारहाण केल्याचा आरोप पीडित मासाळ कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मासाळ कुटुंबीयांच्या तक्रारीबाबत चाैकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.
बेडग येथे जातपंचायतीने तीन कुटुंबांना वाळीत टाकल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST