लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा एमआयडीसीसह तालुक्याच्या उत्तर भागात ५ जून रोजी वादळीवारा व ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली. यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकरी व उद्योजकांना द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ५ जून रोजीच्या पावसाने एमआयडीसीमधील अनेक उद्योगांचे पत्र्यांचे शेड उडून गेले. इमारतींच्या भिंती पडल्या आहेत. यात व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भटवाडी, औढी, करमाळे येथे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. जनावरांच्या वस्ती असणाऱ्या शेडचेदेखील मोठे नुकसान झालेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहेत.
शिरशी कोंडाईवाडी, धामवडे, गिरजवडे, घागरेवाडी, प.त. शिराळा, निगडी, करमाळे, औंढी, भटवाडी, खेड, शिवरवाडी, आंबेवाडीसह तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये शेतीचे बांध फुटून गेले आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणेदेखील वाहून गेले. सुमारे ४ कोटी ७५ लाख रुपये इतके नुकसान झाले असल्याचा पंचनामा अहवाल तहसील कार्यालयाने शासनाकडे पाठवला असून या नुकसानग्रस्त, शेतकरी व उद्योजकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.