सांगली : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा निवडणुकीचे धुमशान सुरू होणार आहे. येत्या आठ दिवसांत पहिल्या टप्प्यातील ७४ संस्थांच्या प्रक्रियेस सुरुवात होईल.
गत ३१ डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार सहा टप्प्यांत घेण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १५२८ संस्थांचा समावेश आहे. पहिला टप्पा आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बहुतांश विकास सोसायट्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह अन्य काही संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.
राज्यातील जिल्हा बॅँका व विकास सोसायटींची निवडणूक राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलली होती. शासनाने आता पुन्हा त्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे कर्जमाफीशी संबंधित जिल्हा बॅँक व विकास सोसायट्यांच्याच निवडणुका सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. ज्या संस्थांचे निवडणूक कार्यक्रम सुरू होते ते त्याच टप्प्यावर थांबवण्यात आले. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसह जिल्ह्यातील ७४ सहकारी संस्थांचा समावेश होता. त्यामुळे या सर्व संस्था जिल्हा निवडणूक आराखड्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात आल्या आहे. यानंतर मार्चमध्ये कोरोनाचे संकट सुरू झाले. यानंतर सरकारने सर्वच सहकारी संस्थांची निवडणूक अनेकदा लांबणीवर टाकल्या.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील निवडणुका घेण्याचे आदेश मंगळवारी दिले. यात जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅँक, पलूस सहकारी बॅँक, जत अर्बन सहकारी बॅँक या तीन बॅँकांसह १७३ सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका फेब्रुवारीअखेर जाहीर होणार आहेत. येत्या सहा ते आठ महिन्यांत जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १५२८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहा टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे.
चौकट
अशा होणार निवडणुका
टप्पा मुदत संपलेली तारीख संस्थांची संख्या
टप्पा क्रमांक १ कर्जमाफी, कोविडमुळे थांबलेल्या संस्था १७३
टप्पा क्रमांक २ ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या संस्था २६९
टप्पा क्रमांक ३ १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० ६७२
टप्पा क्रमांक ४ १ एप्रिल ते ३० जून २०२० २०४
टप्पा क्रमांक ५ १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० २२३
टप्पा क्रमांक ६ १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० २५०
एकूण ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १५२८