सांगली : शहर व परिसरात दुपारपासून अचानक ढगाळ वातावरण झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता नाही. दरम्यान, जिल्ह्याच्या सरासरी कमाल व किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे.
शहर व परिसरात सोमवारी सकाळी काहीअंशी ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीचनंतर ढगांची दाटी वाढली. पावसाची शक्यता वाटत होती, मात्र पाऊस पडला नाही. भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. जिल्ह्याच्या सरासरी कमाल व किमान तापमानात सोमवारी घट झाली. किमान तापमान १७, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी चार दिवस असेच वातावरण राहणार असल्याने थंडी कायम राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत वाढणार असल्याने दिवसाची थंडी कमी होईल.
जिल्ह्याच्या तापमानात सतत चढ-उतार होत आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी धुके, तर कधी थंडी अशा विचित्र वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. शेतकरीही या वातावरणाने त्रासले आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.