सांगली : शहर व परिसरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी ढगाळ वातावरण होते. आगामी तीन दिवस वातावरण असेच राहणार असून तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार येत्या २४ मेपर्यंत दररोज दुपारनंतर किंवा सायंकाळी ढगांची दाटी होऊन पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ मे रोजी केवळ ढगांची दाटी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २६ ते २८ मे या कालावधीत केवळ अंशत: ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या काळात तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सांगली जिल्ह्याचे किमान तापमान २२ अंशापर्यंत खाली आले. कमाल तापमान ३७ अंशावर स्थिर आहे. येत्या सहा दिवसांत कमाल तापमान ३९ अंशापर्यंत जाणार असून दुसरीकडे किमान तापमान २१ अंशापर्यंत घटण्याची शक्यता आहे.