इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील कोविड उपचार केंद्र तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे केली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून हे रुग्णालय नेहमी वादग्रस्त राहिले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २ मे रोजी या रुग्णालयात ऑक्सिजनअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाचे डॉक्टर सचिन सांगळूरकर, त्यांच्या पत्नी नैनिशा सांगळूरकर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अविवेकी वागण्याने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासला आहे.
उपचारासाठी रुग्ण दाखल करून घेताना अनामत रकमेची मागणी करतात. शासनाला उपचाराखालील रुग्ण आणि मृत्यू झालेले रुग्ण यांची चुकीची माहिती दिली जाते. त्यामुळे हे कोविड केंद्र बंद करावे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शाकीर तांबोळी, मनसेचे सनी खराडे, भाजपचे चंद्रकांत पाटील, ‘स्वाभिमानी’चे मकरंद करळे, राष्ट्रवादीचे रॅम कचरे आणि काँग्रेसचे विजय पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो-
इस्लामपूर येथील डॉ. सचिन सांगळूरकर यांच्या रुग्णालयातील कोविड केंद्र बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना शाकीर तांबोळी, सनी खराडे, चंद्रकांत पाटील, मकरंद करळे यांनी दिले.