लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारती उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी स्थायी समिती सभेत नव्या मुख्यालयासाठी ३५ कोटींच्या निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सव्वा लाख चौरस फूट जागेत आता मुख्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे.
स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी सभेत या विषयावर चर्चा झाली. याबाबत सभापती कोरे म्हणाले की, तीन वर्षांत ही इमारत उभारली जाणार आहे. नव्या इमारतीत प्रशस्त चार मजले असणार आहेत. प्रशस्त सभागृहात १२५ नगरसेवक महासभेसाठी बैठक व्यवस्था असेल. याशिवाय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असेल तसेच पत्रकार, नागरिकांसाठी बाल्कनीची व्यवस्था आहे.
या प्रस्तावित मुख्यालात ५०० ते ५०० अधिकारी-कर्मचारी असतील. मुख्यालय तळमजल्यास पाच मजली इमारती असेल. तिथे चार लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. भूकंपरोधक आरसीसी सांगाडा व छतासाठी स्लॅब तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. जास्तीत जास्त कॉलम फ्री चटई क्षेत्र वापरले जाणार आहे. यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास कमी कालावधी लागेल. दोन स्वतंत्र प्रवेशद्वार, नागरिक, कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशिका ठेवली आहे. अपंगासाठी रॅम्पची व्यवस्था आहे. पर्यावरण अनुपालन करून इमारतीचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. वीजबचतीसाठी भरपूर प्रकाश व नैसर्गिक हवा येईल अशी रचना केली जाणार आहे. सौरऊर्जा संच, दिशादर्शक फलक, संरक्षक भिंत अशा सुविधाही असणार आहेत, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.
चौकट
छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा
कॉंग्रेसचे नगरसेवक करण जामदार यांनी विजयनगर येथील महापालिकेच्या नव्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. सांगलीतील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. त्याच धर्तीवर नव्या इमारतीतही पुतळा उभारावा, असे पत्र सभापती कोरे यांना दिले. स्थायीच्या सर्वच सदस्यांनी त्याला सहमती दर्शवित पुतळ्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.