सांगली : घरफोड्या व महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास होण्याचे गुन्हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दुचाकीवरून फिरून गस्त घालण्याचा आदेश दिला आहे. अधिकाऱ्यांसह ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात फिरून गस्त घालावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या आदेशाचे पालन सांगली, मिरजेत सुरू झाले आहे.सांगली, मिरजेत सातत्याने घरफोडीचे गुन्हे घडत आहेत. विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. गेल्या आठवड्यात चोरट्यांनी एकाचदिवशी तीन अपार्टमेंटमधील नऊ फ्लॅट फोडून धुमाकूळ घालून पोलिसांना आव्हान दिले. घरफोडी व साखळी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू असताना सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांकडून हे गुन्हे उघडकीस आणण्यात अपयश आले आहे. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखा असूनही त्यांची समाधानकारक कामगिरी नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघांच्या टोळीला पकडून साखळी चोरीच्या १३ गुन्ह्यांचा छडा लावत ३७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. यामुळ सध्या तरी हे गुन्हे थांबले आहेत. सांगली, मिरजेत पोलिसांची गस्त सुरू आहे. बीट मार्शलचे पोलीसही तैनात केले आहेत. मात्र तरीही अधून-मधून गुन्हे घडत आहेत. ठाण्याचे अधिकारी मोटारीतून गस्त घालण्यासाठी जातात. मात्र त्यांची गस्त प्रमुख रस्त्यावर असते. मोटार गल्ली-बोळात जात नसल्याने तेही मोटारीतून उतरत नाहीत. यामुळे सावंत यांनी अधिकाऱ्यांनीही दुचाकीवरून फिरुन गस्त घालण्याचा आदेश दिला आहे. पोलीस ठाण्यात काम नसेल तर कर्मचाऱ्यांनी थांबू नये. त्यांनीही दुचाकीवरून हद्दीत फिरावे. साध्या वेशात गस्त घालण्याची सूचना केली आहे. याचे पालनही सुरू झाले आहे. शहर परिसरात गेल्या तीन महिन्यापासून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणत वाढले आहे. विशेषत: वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने धूम टोळीकडून लंपास करण्यात येत आहे. यामुळे महिलांच्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. पोलिसांनी पकडलेल्या टोळीहून आणखी एक टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शहरातील पोलीस अधिकारी दुचाकीवर
By admin | Updated: July 2, 2014 00:37 IST