सांगली : ओबीसी व भटक्या-विमुक्त जातीजमाती संघटनेतर्फे बहुजनांच्या स्फूर्तीस्थळांची परिक्रमा आयोजित केली आहे. ओबीसी नेते मंत्री विजय वडेट्टीवार व भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ती निघेल, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अरुण खरमाटे यांनी दिली.
ब्रिटिशांनी ऑगस्ट १८७१मध्ये भटक्या-विमुक्तांसाठी सेंटलमेंट छावण्या सुरु केल्या. त्याला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिक्रमा आयोजित केली आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी छावण्या उभारल्या होत्या. १९८ जाती-जमातींमधील भटक्यांना तेथे बंदिस्त केले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांची मुक्तता झाली. सोलापुरात रामवाडी येथेही अशीच छावणी होती. त्याच जागेवर येत्या ३१ ऑगस्ट रोजी परिषद आयोजित केली आहे. त्यासाठी वडेट्टीवार, गायकवाड यांच्यासह १९८ जाती-जमातींचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. वर्षभर चालणाऱ्या परिक्रमेचे स्वरुप, मार्ग, प्रारंभ, सांगता आदी रुपरेखा याचवेळी वडेट्टीवार जाहीर करतील.
खरमाटे म्हणाले की, परिक्रमेंतर्गत चौंडी, पाली, ज्योतिबा, पुरंदर, बाणुरगड, माहुर, भगवानगड, मढी, सिंदूर, पोहरादेवी अशी भटक्या विमुक्तांची श्रद्धास्थाने व स्फूर्तीस्थळे असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या जातील. या माध्यमातून त्यांचे संघटन केले जाईल. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागवला जाईल. १९ टक्के भटक्यांना आजही स्वत:ची जागा, घर, शेती नाही. विकासाच्या प्रवाहातून त्यांना बाहेरच ठेवले आहे. त्यांच्यासाठी हा जागर असेल.
या परिषदेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना, १०२ वी घटना दुरुस्ती, ओबीसींचे राजकीय आरक्षण, ७२ वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्न आदी विषयांवरही विचारमंथन होईल. या बैठकीला सुनील गुरव, अर्चना सुतार, अजित भांबुरे, संजय विभुते, नंदकुमार नीळकंठ, दीपक सुतार, बाळासाहेब गुरव, चंद्रकांत मालवणकर, रंजना माळी, नीलेश भांबुरे, वसुधा कुंभार, बाळासाहेब कुंभार आदी उपस्थित होते.
चौकट
मोदींची वेळ मागितली
ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार व पंकजा मुंडे हे मोदींना भेटणार आहेत.