चिंचणी (अंबक) (ता. कडेगाव) येथील १५३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा सोनहिरा तलाव तुडुंब भरला आहे. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच या तलावाच्या स्वयंचलित दरवाजांवर पाण्याच्या दाब वाढत आहे. यामुळे पाऊस सुरू होताच पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तलावाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. याशिवाय पावसाळ्यातही सर्वोतोपरी दक्षता घेण्याची गरज
आहे.
चिंचणीचा तलाव दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुडुंब भरतो. मागील वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस झाला. त्यामुळे तलाव सातत्याने तुडुंब भरलेलाच होता. यानंतर उन्हाळ्यात पाणी पातळी खालावली; परंतु ताकारी योजनेचे पाणी या तलावात
सोडले होते. मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही दमदार बरसला. यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच हा तलाव तुडुंब भरलेला आहे. सोनहिरा खोऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. यामुळे हा तलाव दरवर्षी तुडुंब भरतो.
मात्र, यावर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वीच
तलाव भरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या तलावातून हजारो हेक्टर शेतजमिनीला मुबलक पाणी मिळते. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
चौकट
लवकरच पूरस्थिती ?
चिंचणी तलावाला ३१ स्वयंचलित दरवाजे आहेत. पाण्याच्या दाबाने हे दरवाजे आपोआप उघडतात.
फक्त तीन ते चार दरवाजे उघडले तरी
सोनहिरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होते. या पुरामुळे सोनहिरा ओढ्यावरील सर्व पूल आणि येरळा नदीवरील रामापूर, कमळापूर पूल पाण्याखाली जातात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य वेळी व्यक्तिचलित दोन दरवाजांतून पाणी सोडून देणे गरजेचे आहे.
फोटो : ०९ कडेगाव १
ओळ :
चिंचणी (अंबक) (ता. कडेगाव) येथील तलाव मान्सून सुरू होण्यापूर्वीच तुडुंब भरला आहे.