सांगली : आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून अस्वस्थ असल्याने तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. प्रशांत दिनकर भंडारे (वय २०, रा. विकासनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे या तरुणाचे नाव आहे. पंचशीलनगर येथील रेल्वे फाटकाजवळ आज (गुरुवार) सकाळी त्याचा मृतदेह सापडला. प्रशांत गणपतराव आरवाडे महाविद्यालयात बी.कॉम.ला पहिल्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील कापड पेठेतील दुकानात कामास आहेत. त्याला सुप्रिया (वय १७) व अक्षय (१४) हे बहीण-भाऊ आहेत. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले आहे. तो आईचा लाडका होता. यामुळे तिच्या मृत्यूचा धक्का त्याला सहन झाला नाही. तेव्हापासून तो नाराज होता. यातून काल (बुधवार) सायंकाळी त्याने हाताची नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बहीण व भावाने त्याला रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र तो गेला नाही. सायंकाळी सात वाजता तो घरातून निघून गेला. आठ वाजता त्याचे वडील कामावरुन घरी आले. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला. परंतु तो सापडला नाही.आज सकाळी दहा वाजता पंचशीलनगर रेल्वे फाटकाजवळ शीर नसलेला मृतदेह सापडला. परिसरातील लोकांची गर्दी झाली. मृतदेहाच्या खिशातील ओळखपत्रावरुन हा मृतदेह प्रशांतचा असल्याचे निष्पन्न झाले. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्या वडिलांचा जबाब घेण्यात आला. यामध्ये त्यांनी प्रशांत त्याच्या आईचे निधन झाल्यापासून नाराज होता, यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)
आईच्या मृत्यूनंतर मुलाची आत्महत्या
By admin | Updated: August 22, 2014 00:53 IST