ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, ठाणापुढे, करंजवडे, कार्वे, डोगरवाडी, देवर्डे, जक्राईवाडी, ढगेवाडी येथे मुसळधार पाऊस झाला आहे. या परिसरातील सर्व नाले, बंधारे, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत. चिकुर्डे येथील वारणा नदीवरील जुना चिकुर्डे - वारणानगर पूल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत होती.
बुधवारी रात्री मुसळधार पावसाने सुरुवात केली. गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्व ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साठले, अनेक ठिकाणी जमीन खचली आहे. दरम्यान परिसरातील जवळपास ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून, खरीप पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे.