सांगली : भाजप नेते अमित शहा व शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यात जशी निवडणूकपूर्व चर्चा झाली तशीच मोघम चर्चा सांगली जिल्हा परिषदेतील पदांबाबत झाली होती. त्यामुळे कुणी पदाबाबत गैरसमज करू नये, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पाहू, असे विधान केले असताना उद्धव ठाकरे यांनी ते पद मिळणार हे गृहीत धरले. अशा प्रकारच्या चर्चा या जिल्हा परिषद व महापालिकेतही झाल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत गैरसमज करण्यात येऊ नये. पाहू म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द मिळालाच, असा गैरसमज केला होता.
अशा गैरसमजातून राज्यात फटका बसला तसा सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थेत बसणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी नकार दर्शविला. ते म्हणाले, आमचे संख्याबळ मजबूत असल्याने चिंता नाही. अडचण नसली तरी आम्ही सतर्कता बाळगून आहोत. पदाधिकारी बदलाबाबत झालेल्या चर्चेबाबत कोणतीही माहिती आम्ही जाहीर करणार नाही. जिल्हा परिषद सदस्य व महापालिकेतील नगरसेवकांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी आमची चर्चा सुरू असून, योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल.