इस्लामपूर : शिराळा (ता. वाळवा) येथील शासकीय विश्रामगृहालगतच्या शासकीय औद्योगिक विद्यालयासमोरील (आयटीआय) रस्त्यावर आज, सोमवारी सायंकाळी दुचाकी व पिकअप् व्हॅनची धडक होऊन इस्लामपूरचे माजी उपनगराध्यक्ष, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नाथा खराडे (वय ५२) ठार झाले. अपघातात अन्य एक जखमी झाला. शिवाजी माने (रा. नांद्रे, ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चंद्रकांत खराडे व शिवाजी माने दुचाकीवरून (एमएच १० एम ७७०४) शिराळाकडे निघाले होते. त्याचवेळी शिराळाहून इस्लामपूरकडे मालवाहतूक करणारी पिकअप व्हॅन (एमएच १० एक्यू ३५८३) निघाली होती. शिराळा रस्त्यावरील आयटीआयसमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. या धडकेत पाठीमागे बसलेल्या खराडे यांच्या छातीला जोराचा मार बसला. हात-पाय मोडल्याने अंतर्गत रक्तस्रावाने ते जागीच ठार झाले. जखमी शिवाजी माने यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चंद्रकांत खराडे अपघातात ठार
By admin | Updated: June 17, 2014 00:44 IST