लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘आयुष्यभराचा जोडीदार’, ‘माझी लेक माझा अभिमान’, ‘वावर हाय तर पावर हाय’, आई लेक, ‘कपल’ चॅलेंज, ‘रुबाबदार’ या आणि अशा सोशल मीडियावरील ‘ट्रेंड’मध्ये तुम्ही सहभागी होत असाल तर सावधान. या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन भरभरून मिळणाऱ्या ‘लाइक’ आणि ‘कमेंट’पेक्षा तुमची महत्त्वाची माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने सोशल मीडियावर आपले फोटो, माहिती व ठिकाण पाठविताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे सोशल मीडियावरील वावरही वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही ट्रेंड सुरू असून, त्यात अनेकजण उत्स्फूर्तपणे सहभागीही होत आहेत. आपल्या पत्नी, मुलांसह इतर फोटो याठिकाणी पोस्ट केले जात आहेत. कुटुंबाचेच नव्हेतर काही ट्रेंडमध्ये आपल्या चारचाकी वाहनांचे, शेताचे, इतर वस्तूंचेही फोटो असल्याने वैयक्तिक माहिती सर्वांना माहिती होत आहे.
आपली व कुटुंबाची माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने त्याचा गैरवापर होण्याचीच शक्यता अधिक आहे. यात फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी महिलांचे फोटो मॉर्फ करून ती पुन्हा सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याशिवाय या ‘चॅलेंज’मध्ये नाव, कधीकधी पत्ताही दिला जात असल्याने गंडा घालणाऱ्यांना आयती संधी चालून आली आहे.
कोट
सोशल मीडियावर जास्तीतजास्त खबरदारी घेणे कधीही सोयीचे ठरणार आहे. विशेषत: महिलांनी या माध्यमाचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. आजकाल सोशल मीडियावर जेवढे जास्त मित्र असणे हे ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरत आहे. मात्र, यातून पुढील त्रासदायक प्रकार टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींना आपल्या मित्र यादीत स्थान न देणे, अशा चॅलेंजमध्ये भाग घेताना काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे.
संजय क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
कोट
सोशल मीडियावरील ट्रेंड हे मुख्यत्वेकरून मार्केटिंग कंपन्यांच्या सर्वेक्षणाचाच भाग असतो. लोकांची आवड, त्यांचे राहणीमान, त्यांचा कल जाणून घेण्यासाठी असे प्रयोग केले जातात. याशिवाय वैयक्तिक माहितीही मिळू शकत असल्याने या पडताळणीतून कंपन्या जनमानसाचा अंदाज काढत असतात. त्यामुळे अशा ट्रेंडमध्ये सहभागी होणे अडचणीचेच ठरू शकते. आपल्या वैयक्तिक माहितीचा व्यावसायिक धोरणासाठी वापर टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे.
- दिनेश कुडचे, सायबर तज्ज्ञ