कोविड प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रियेत नव्याने बदल झाले आहेत. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी मिरज शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षीही ई-छाननी व प्रत्यक्ष छाननी असे दोन पर्याय विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत. ई-छाननी प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्जाच्या पडताळणी व निश्चितीसाठी सुविधा केंद्रावर जाण्याची गरज नसेल. विद्यार्थी स्वत: सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संगणक, मोबाइल अथवा अन्य सुविधेद्वारे अपलोड करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांकडे वरील सुविधा उपलब्ध नाहीत ते प्रत्यक्ष छाननीद्वारे सुविधा केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. शासकीय तंत्रनिकेतन, मिरज येथील सुविधा केंद्रात समुपदेशन कक्षात पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसह संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती, सुविधा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाईल. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या व पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मिरज शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांनी केले आहे.