लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : साखर आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाचे धोरण, मागणी व साखरेचा उठाव आणि शेतकऱ्यांची जादा दराची मागणी यात मेळ घालणे कठीण बनले आहे. याचा विचार करून साखर कारखान्यांनी हजारो कोटी रुपये भरलेल्या करातून शासनाने प्रतिटनास ५०० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली.
येथील हुतात्मा कारखान्याच्या ४०व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, यशवंत बाबर, राजाराम वाजे, भगवान पाटील, वीरधवल नायकवडी, अण्णा मगदूम, शिवाजी अहिर, डाॅ. संताजी घोरपडे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, एस. बी. बोराटे प्रमुख उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, खासगी कारखान्यांशी असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे सहकारी साखर कारखान्यांवर गंभीर परिणाम झाले आहेत. सहकारी कारखान्यांना एफआरपी रक्कम देणे अवघड झाले आहे. सध्या एमएसपी ३१०० रुपयांऐवजी ३६०० रुपये पाहिजे. बाजारपेठेत साखरेचा दर तीन हजार रुपये आहे. त्यामुळे अनेक कारखाने अल्प नफ्यात आहेत.
कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन सभेत चंद्रशेखर शेळके, नंदकुमार शेळके यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यांची उत्तरे अध्यक्ष नायकवडी यांनी दिली; पण त्या उत्तरांतून सभासदांचे समाधान झाल्याचे दिसले नाही.
चाैकट
विविध प्रकल्प मंजूर
वैभव नायकवडी म्हणाले, हुतात्मा कारखान्याला २४ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पास आणि दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार टन उभारणीस परवानगी दिली आहे. दैनंदिन एक लाख इथेनाॅल प्रकल्पाची क्षमता करण्यासाठीही परवानगी मिळाली आहे.