लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : अडचणीत आलेला देशातील साखर व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेवून निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची आधारभूत किंमत ३,५०० रुपये करावी तरच देशातील साखर उद्योग तरतील, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शेतकऱ्यांना दीपावलीत ऊसाचा अंतिम हप्ता देऊन दिवाळी गोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात रोलर पूजन व आठ मेगावॅट क्षमतेचे टर्बाईन बसविण्याच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, युवा नेते विराज नाईक, ‘प्रचिती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले, कोरोना संसर्ग असतानाही कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी करत हंगाम यशस्वी केला. या हंगामातील गाळप ऊसाला आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २,७५० रुपये दिले आहेत. अंतिम बिल दीपावलीला देऊन दीपावली गोड करणार आहे. कोरोना महामारीत म्हणावा तसा साखरेचा उठाव स्थानिक बाजारपेठेत झालेला नाही. गेल्या हंगामातील साखर शिल्लक राहिली आहे. केंद्र शासनाने ३,५०० रुपये साखरेची आधारभूत किंमत करावी अन्यथा साखर उद्योगाच्या अडचणी वाढणार आहेत. ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतावाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. युवक राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आठ मेगावॅट क्षमतेचे टर्बाईन बसवणे कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी संचालक विजयराव नलवडे, संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, तानजी वनारे, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळी : विश्वास कारखान्यात रोलर पूजन व आठ मेगावॅट क्षमतेचे टर्बाईन बसविणे कामाचे भूमिपूजन करताना अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, राजेंद्रसिंह नाईक, विराज नाईक आदी.