लिंगनूर : बेळंकी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला १ जानेवारी रोजी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जानेवारी महिन्यात भरगच्च उपक्रम व कार्यक्रमांसह शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थी मेळावा, विविध स्पर्धा, भव्य वृक्षलागवड, स्नेहसंमेलन, कथाकथन, महिलापालक व मातांच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद अशा विविध उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती बेळंकी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने देण्यात आली.बेळंकी (ता. मिरज) येथील शाळेची स्थापना ब्रिटिश काळात १ जानेवारी १८८९ रोजी झाली असल्याने यंदा १ जानेवारी २०१५ रोजी शाळेला स्थापनेपासून १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन शतकोत्तर रौप्यमहोत्सव व त्यानिमित्ताने विविध स्पर्धा, व्याख्याने व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त बेळंकी शाळेच्या परिसरात १२५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, तर रौप्यमहोत्सवाचे उद्घाटन १ जानेवारी रोजी, प्रभातफेरी, सायंकाळी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व महिलांच्या आरोग्यविषयक डॉ. रवींद्र आरळी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात ३१ जानेवारीपर्यंत कथाकथन, १२५ वृक्षांचे वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा सत्कार, आजी माजी सैनिक मेळावा, सर्व माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे महिनाभर आयोजन करण्यात आले आहे. तर उर्वरित वर्षभर किमान महिन्यात एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आजपासून
By admin | Updated: December 31, 2014 00:08 IST