सांगली : सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही वाक्षेवाडी (ता. आटपाडी) येथे विनापरवानगीबैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी झरे येथे शर्यत घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने वाक्षेवाडी येथे शर्यती झाल्या.
बैलगाडी शर्यती आयोजनास न्यायालयाची बंदी असतानाही पडळकर यांनी शर्यत घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी व जमावबंदी आदेश दिला होता. पोलीस दलानेही तीन पोलीस उपअधीक्षक, १२ निरीक्षक, ४१ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३१५ पोेलीस कर्मचऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पडळकर यांनी प्रशासनाचा आदेश धुडकावत झरे येथे शर्यत न घेता वाक्षेवाडी येथे घेतल्या. त्यामुळे त्यांच्यासह ४१ कार्यकर्ते व अन्य ८ ते १० जणांवर आदेशाचा भंग, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कोट
बैलगाडी शर्यतीस परवानगी नसल्याने बंदी आदेश लागू केले होते. तरीही गोपीचंद पडळकर यांनी प्रतीकात्मक स्वरूपात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
-डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
कोट
शर्यतीचे आयोजन करू नये यासाठी संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. तरीही शर्यत आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढेही कोणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
-दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक