विटा : गेल्या महिनाभराच्या कडक लॉकडाऊननंतर लावण्यात आलेले निर्बंध आता अंशत: शिथिल केले आहेत. असे असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी विटा शहरासह खानापूर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.
शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये लावलेले निर्बंध अंशत: शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे विटा शहरात नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करीत कुटुंबाची सुरक्षा आणि तालुका कोरोनामुक्त करण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले, गेल्या महिनाभरात विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब होती. त्या काळात प्रशासनाने कडक निर्बंध लावले. त्यामुळेच विटा शहरासह परिसरात रुग्णांची वाढती संख्या कमी झाली. ही सर्वांना दिलासा देणारी घटना आहे.
मात्र, कोरोनाचे संक्रमण अद्याप पूर्णपणे थांबलेले नाही. तसेच लसीकरणाची गतीही सध्या मर्यादित आहे. या गोष्टी सर्वांनी लक्षात घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोना संक्रमण रोखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. गेल्या महिनाभराच्या लॉकडाऊनमुळे व कडक निर्बंधामुळे अनेकांचे व्यापार, उद्योग, रोजगार थांबले होते. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले; पण स्वत:सह आपला परिवार संक्रमणापासून दूर ठेवायचा असेल तर सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.