बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील रोझावाडी बायपास रस्त्यालगत आलेल्या शेतामध्ये तीन महिने वय असलेल्या बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मंगळवारी आढळून आला.
काकाचीवाडी ते रोझावाडी बायपास रस्त्याला जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला मंगळवारी सकाळी काही मजुरांना उसाच्या शेतात पाणी पाजत असताना तीन महिन्यांचे बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळून आले. याविषयी मजुरांनी सतीश शेटे व सर्पमित्र मुरलीधर बामणे यांना याची कल्पना दिली. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
त्यानंतर वनअधिकारी अमोल साठे व विजय मदने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिल्लू पाहून खात्री केली. जागेवर पंचनामा केला व भरकटल्यामुळे हे पिल्लू या भागात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बिबट्याचा वावर या भागात असल्याची भीती उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिसरात बिबट्याचा वावर आहे का याची खात्री करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.