मिरज : मिरज तालुक्यातील १५८ सहकारी संस्थांची नोंदणी उपनिबंधकांनी रद्द केली आहे. अनेक वर्षे कामकाज बंद असलेल्या पतसंस्था, औद्योगिक संस्था, वाहतूक संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था, पर्यावरण विकास संस्था व स्वयंरोजगार संस्थांचा यात समावेश आहे. संस्था रद्द करण्याबाबत ३० मार्च रोजी हरकती नोंदवून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. मिरज तालुक्यात सुमारे बाराशे सहकारी संस्था असून, यापैकी कामकाज बंद असलेल्या, पत्ता सापडत नसलेल्या, अनेक वर्षे हिशेब सादर न केलेल्या संस्थांवर अवसायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंद असलेल्या संस्थांचे कामकाज पाहण्यासाठी अवसायक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी सहकार विभागाचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. एका कर्मचाऱ्याकडे ४० ते ५० सहकारी संस्थांचा अवसायक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खासगी लेखापरीक्षकांचीही अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवसायकांच्या नियुक्तीनंतरही बंद पडलेल्या या संस्थांचे कामकाज ठप्प असल्याने या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची नोटीस सहकार उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. बंद असलेल्या संस्थांमध्ये सहकारी स्वयंरोजगार संस्थांची संख्या सर्वाधिक आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केलेल्या सहकारी स्वयंरोजगार संस्थेला शासनाचे अनुदान मिळत असल्याने मोठ्याप्रमाणात स्वयंरोजगार संस्थांची नोंदणी झाली आहे. मात्र अनुदान बंद झाल्यानंतर या स्वयंरोजगार संस्थांचे कामकाज बंद आहे. स्वयंरोजगार संस्थांप्रमाणेच बंद असलेल्या पतसंस्था, औद्योगिक संस्था, वाहतूक संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था, पर्यावरण विकास संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी ३० मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द झाल्यानंतर त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. (वार्ताहर)या संस्थांचा समावेशनोंदणी रद्द होणाऱ्या पतसंस्थांमध्ये विश्वशक्ती, जवाहर, कबीर अर्बन, हिंद अर्बन, श्रीकृष्ण, वसंत (मिरज), रुक्मिणी, वसंतदादा सेवक, सिम्बायोसीस, तिरूपती, सरकारी रुग्णालय नोकर पतसंस्था (सांगली), गणेश (खटाव), पराग (हरिपूर) यांचा समावेश आहे.
दीडशेवर सहकारी संस्थांची नोंदणी रद्द
By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST