किरण सावंत : किर्लोस्करवाडी :किर्लोस्करवाडी, रामानंदनगर परिसरातील हजारो प्रवाशांचे बसस्थानकांचे स्वप्न परिवहन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधुरेच राहिले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. किर्लोस्करवाडीत किर्लोस्करांचा कारखाना, रेल्वेस्थानक, विविध शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, बाजारपेठ अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने दररोज दहा ते पंधरा गावातील नागरिकांचा दैनदिंन संपर्क असतो. विद्यार्थी-कामगार आदी हजारो प्रवासी रामानंदनगरमधून ये-जा करीत असतात. जिल्ह्यातील १०० हून अधिक एसटी बसेस किर्लोस्करवाडीमार्गे जातात. तरीही गावात बसस्थानक नाही की प्रवाशांसाठी साधे निवारा शेडही नाही. ऊन, पावसात प्रवाशांना एसटी बसची वाट पहावी लागते. रामानंदनगर येथे बसस्थानक व्हावे, ही मागणी तशी जुनीच आहे. विकासाचे जाळे बनल्याने या परिसरात परिवहन खात्याला उत्पन्न चांगले मिळते, तरीही बसस्थानकाच्या मागणीला आतापर्यंत तरी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. परिसरातील प्रवाशांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुभाष माळी यांनी केला. यासाठी प्रवासी संघटनाही स्थापन केली. बसस्थानकांसाठीही प्रयत्न केले. पण तेही अपुरे पडले. परिवहन खात्यानेही या परिसरातील प्रवाशांची बसस्थानकाची मागणी पूर्ण करून त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी गंभीरपणे विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रामानंदनगर, बुर्ली, दुधोंडी, नागराळे, सावंतपूर, पुणदी, आमणापूरसह परिसरातील नेत्यांनी या बसस्थानकांसाठी आग्रही भूमिका घेण्याची मागणी होत आहे. पलूस गावात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुसज्ज बसस्थानक झाले. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. कदम यांनी किर्लोस्करवाडीतील नागरिकांची बसस्थानकाची मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
किर्लोस्करवाडीत बसस्थानकाची मागणी
By admin | Updated: October 26, 2014 23:23 IST