कोल्हापूर रोडवरील गोसावी गल्ली येथे संगीता गायकवाड यांचे घर आहे. शुक्रवारी त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटाचा दरवाजा फोडून तीन लाख रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, महागड्या साड्या असा चार लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री आठ वाजता संगीता गायकवाड या घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. भरदिवसा घरफोडीप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
मिरज शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वीही वारंवार घरफोड्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. मात्र, चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या बंदोबस्ताची नागरिकांची मागणी आहे.