शिराळा : काळामवाडी (ता. शिराळा) येथील जॅकवेलमध्ये पडलेल्या बैलाला तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. यावेळी आपल्या बैलाला वाचविण्यासाठी मालकही आडीच तास जॅकवेलमध्ये उभा राहिला होता.
काळामवाडी येथील सखाराम पाटील आपल्या मुलासह गावच्या जॅकवेलजवळ बैलांना धुण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी बैल धूत असताना रस्त्यावरील वाहनाच्या आवाजाने बैल बिथरला आणि उडी मारत थेट जॅकवेलमध्ये पडला. त्यास जॅकवेलला पायऱ्या नसल्याने आणि पाणी खोल असल्याने बैलास बाहेर काढणे अवघड झाले होते. बैल बुडू लागला. त्यामुळे त्यास वाचविण्यासाठी सखाराम पाटील यांचा मुलगा रुपेश याने जॅकवेलमध्ये उडी मारली. बैलांसह पोहत त्याने बैलाचे तोंड वर धरले. तो बैलासह अडीच तास पाण्यात पोहत राहिले. त्यावेळी पणुंब्रे वारुण येथील नितीन ढेरे यांचा जेसीबी आणून बैलास दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थ व पाटील कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.
बैल जॅकवेलमध्ये पडल्याची घटना समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या बैलास बाहेर काढण्यासाठी किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, उपसरपंच आनंदा सावंत, सतीश किनारे, संतोष पाटील, शामराव चव्हाण, प्रकाश सोंडुलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली.
फोटो-१४शिराळा२