सांगली : कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणार्या शिराळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एकनाथ आवडाजी पारधी (वय ३६, रा. शिराळा, सध्या कोतुल, जि. अहमदनगर) यास आज (गुरुवारी) निलंबित करण्यात आले. याशिवाय सांगली शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व विट्याचे सुरेश चिंचोडीकर या दोन अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कारवाईचा दणका दिला.वाकुर्डे-बुद्रुक (ता. शिराळा) येथील एकाने जमिनीच्या वादातून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण पारधीकडे सोपविण्यात आले होते. पारधीने अर्जातील संशयितास बोलावून ‘तुझ्याविरुद्ध तक्रार अर्ज आला आहे, तुझ्यावर कारवाई करायची नसेल, तर मला पन्नास हजारांची लाच द्यावी लागेल’, अशी मागणी केली होती. पारधीला दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून अटकेची कारवाई केली होती. पथकाने या कारवाईचा अहवाल जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना सादर केला होता. याची सावंत यांनी दखल घेऊन पारधीला निलंबित केले आहे. त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.दरम्यान, सांगली शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची आटपाडी पोलीस ठाण्यात, तर विट्याचे सुरेश चिंचोडीकर यांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या दोन अधिकार्यांविरुद्ध गंभीर तक्रार आल्या होत्या. यामुळे त्यांचा बदल्या केल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारींची अनेक ठाण्यात दखल घेतली जात नाही. यामुळे लोक न्याय मागण्यासाठी थेट माझ्याकडे येत आहेत. पोलीस अधिकारी असो अथवा कर्मचारी, त्यांनी स्वत:चे काम प्रामाणिकपणे करावे. ज्यांच्याकडे प्रलंबित गुन्हे आहेत, त्यांनी ते तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)
लाचखोर हवालदार निलंबित
By admin | Updated: June 6, 2014 00:36 IST