सचिन लाड - सांगली -‘थर्टी फर्स्ट’ला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सुरू केलेल्या ‘नाकाबंदी’ व ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधातील मोहिमेमुळे सांगलीतील हुल्लडबाज आणि तळीरामांना चाप बसला. शहरातील रस्त्यांवर पोलिसांशिवाय कोणीच नसल्याचे चित्र होते. परिणामी शहरात कोठेही अपघात झाला नाही अथवा किरकोळ मारामारीही झाली नाही. बुधवारी सायंकाळी सातपासून पोलीस रस्त्यावर उतरले होते. रात्री दहा वाजता कोल्हापूर रस्ता, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक, पुष्पराज चौक, विश्रामबाग, कॉलेज कॉर्नर, आझाद चौक, आमराई, आपटा पोलीस चौकी, स्टेशन चौक, टिळक चौक, शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौक, माधवनगर रस्त्यावरील संपत चौक याठिकाणी बॅरिकेटस् लावून नाकाबंदी सुरू केली. प्रत्येक वाहनास थांबवून, चालकाने मद्यपान केले आहे का, याची तपासणी केली जात होती. प्रत्येक पॉर्इंटवर २० ते २५ पोलीस होते. यामध्ये चार शस्त्रधारी पोलिसांचा समावेश होता. तळीरामांची पायपीटएरव्ही पोलिसांची नाकाबंदी असली की, नशेत वाहन चालविणारे तळीराम गल्ली-बोळाचा आधार घेऊन वाहनासह निसटून जातात. मात्र आज रात्री सर्वत्र पोलीस असल्याने अनेक तळीरामांनी दुचाकी ओळखीच्या ठिकाणी लावून पायपीट करीत घर गाठले. तरीही पोलिसांनी त्यांच्याकडे कोठून आलात, कुठे निघालात, याबाबत चौकशी केलीच.जल्लोष साजरा करण्यास पोलिसांचा विरोध नाही; मात्र नशेत वाहन चालवून अपघात होतात. नशेत किरकोळ वादातून मारामारी होते. याला आळा घालण्यासाठी तपासणी सुरू असते. ‘थर्टी फर्स्ट’मुळे मोहीम आणखी तीव्र केली होती. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगलीअभूतपूर्व फौजफाटाशहरात ३० अधिकारी व ४०० पोलीस कर्मचारी असा पोलिसांचा अभूतपूर्व फौजफाटा तैनात केला होता. पहाटे चारपर्यंत बंदोबस्त होता. शिवाय स्वतंत्रपणे दुचाकीवरून फिरणारी गस्ती पथके होती. रात्री अकरा वाजता हॉटेल्स, ढाबे, पानटपरी बंद झाल्या आहेत का नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील पथके नियुक्त केली होती.हॉटेल्स, ढाबे, दारू विक्रेत्यांना फटकापोलिसांच्या या मोहिमेचा सर्वाधिक फटका हॉटेल्स, ढाबे चालक व दारू विक्रेत्यांना बसला. कारवाईच्या भीतीने लोक जल्लोष साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेच नाहीत. थर्टी फर्स्टला व्यवसाय जादा होतो, म्हणून हॉटेल्स, ढाबे चालकांनी जादा मालाची खरेदी केली होती. त्यांच्यासह किरकोळ हातगाडी विक्रेत्यांचे पदार्थही ग्राहकांविना पडून राहिले. रात्री अकरालाच व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून घर गाठले. पानटपऱ्याही साडेदहाला बंद झाल्या होत्या.‘एसपी’ चांगले आलेत...विश्रामबाग येथील एक वृद्ध महिला रात्री बारा वाजता जिल्हा परिषदेजवळील चर्चमध्ये प्रार्थनेला जाण्यासाठी विश्रामबागच्या थांब्यावर उभी होती. तिने एका दुचाकीस्वारास सोडण्याची विनंती केली. दुचाकीस्वाराने तिला तिथे सोडले. वाटेत त्याने वृद्धेला ‘आजी, आज ३१ डिसेंबर आहे. लोक दारू पिऊन वाहन चालवितात. अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर असे बसत जाऊ नका’, असे सांगितले. यावर वृद्धा म्हणाली, ‘माझ्या नातवाने सांगितले आहे की, एसपी फार चांगले आले आहेत. आज कोणीही दारू पिऊन वाहन चालवत नाही, यामुळे मी तुम्हाला हात करून थांबविले.’
जिल्ह्यात ‘थर्टी फर्स्ट’च्या अपघातांना लागला ब्रेक
By admin | Updated: January 2, 2015 00:18 IST