जत : जत शहरातील शिवानुभव मंडप येथे धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ४२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटला. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सरिता विजय जाधव यांनी पोलिसात दिली आहे.
शनिवारी रात्री जाधव कुटुंबीय झोपल्यानंतर पहाटे ३० ते ३५ वयोगटांतील तोंडाला बुरखा बांधलेल्या तरुणांनी घरासमोर येऊन बेल वाजवली. सरिता जाधव यांनी दरवाजा उघडला. समोरील अज्ञात चोरट्यांनी त्यांना पाहताच जाधव यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. या शस्त्राचा धाक दाखवून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने सुमारे १ लाख ७२ हजार किमतीचा ऐवज जबरदस्तीने ताब्यात घेतला. तसेच कपाटातील १ लाख ७२ हजार रुपये राेकड असा एकूण २ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक महेश मोहिते करीत आहेत.