सांगली : शहरातील गोकुळनगर परिसरात पाठलाग करून तरुणावर खुनीहल्ला करणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गणेश सदाशिव खोत (वय २८, कुपवाड), सागर तातोबा पारेकर (२८, अभिनंदन कॉलनी, संजयनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गणेश दादासाहेब पांढरे (२२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) याच्यावर हल्ला करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुपवाड येथील रहिवासी असलेला गणेश पांढरे हा गवंडी काम करतो. गुरुवारी सायंकाळी काम आटोपल्यानंतर सांगलीत आल्यानंतर तो टिंबर एरियामध्ये मित्रासह बोलत थांबला होता. मध्यरात्रीपर्यंत तो या परिसरात होता. यावेळी संशयितांनी बोलण्याच्या कारणावरून गणेशवर वार केले. त्याच्या पोटावर आणि छातीवर वार केले. जखमी गणेशला तातडीने सिव्हिलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याने याची फिर्याद दिली होती. त्यानुसार रात्री उशिरा दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.