कवठेमहांकाळ : थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे शुक्रवारी अनैतिक संबंधातून झालेल्या भरत ज्ञानदेव खोत (वय ३२) यांच्या खून प्रकरणातील दोघा संशयित आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांनी शनिवारी अटक केली. भगवान रंगराव खोत (वय ३७, रा. थबडेवाडी), आकाश मधुकर खोत (वय १९, रा. विठुरायाचीवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान अनैतिक संबंधाच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालून भरत ज्ञानदेव खोत याचा भगवान खोत, आकाश खोत यांनी खून केला होता. त्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. याप्रकरणी भरत खोत यांची पत्नी सुवर्णा खोत यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत तक्रार दिली होती.
कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. शनिवारी या पथकांना भगवान खोत व आकाश खोत हे दोघे कोकळे येथे असल्याची माहिती लागली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, विजय घोलप, दादासाहेब ठोंबरे, विनोद चव्हाण, विक्रम चव्हाण, राजू मानवर यांच्या पथकाने तातडीने या दोघांना कोकळे येथे सापळा रचून पकडले व ताब्यात घेत अटक केली.
कवठेमहांकाळ पोलिसांनी २४ तासांच्या आत या खून प्रकरणातील आरोपींना अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.